Tuesday, October 09, 2007

स्वप्ने...

का तुला पाहताना उमलतात स्वप्ने काही..?
मृदुल हळवी तरी का सलतात स्वप्ने का ही..?

क्षणाक्षणाने छळते रात ही अशीच मजला...
अंधारगूज जेव्हा उकलतात स्वप्ने काही...

सुने भकास जरी हे आकाश माझ्या मनाचे,
अलवार चांदण्यांची फुलतात स्वप्ने काही...

ही जादू तुझ्या स्वरांची भारते रान सारे,
वाट माझ्या पावलांची बदलतात स्वप्ने काही...

Wednesday, September 19, 2007

मी स्वच्छंद भरारतो...

मी स्वच्छंद भरारतो,
मनानं...कधी देहानं...
कधी कंटाळून जगण्याला,
कधी जगण्याच्याच मोहानं..

कधी कुठे गवसतात
कलकल कविता झ-यांच्या...
हिरवळीत उमटलेल्या
पाऊलखुणा प-यांच्या..

कधी ओठांनी पिऊन घेतो
रंग अबोली फुलांचे..
अन डोळ्यांनी टिपून घेतो
हसू हसर्या मुलांचे...

पाऊलांच्या उर्मीनं...
कधी मृद्गंधाच्या स्नेहानं..
मी स्वच्छंद भरारतो,
मनानं...कधी देहानं...

Monday, September 17, 2007

एक शून्य...

खरंतर..
'मी'पण विसरुन प्रेम करण्यातच तो फसतो..
आणि असंच समजून बसतो, तिचंही तसंच असावं...

मग कधीतरी ती विचारते अचानक,
'तुझा काय संबंध..? तू आहेस कोण...?'
त्याला मग काही बोलताच येत नाही..
तो कोण आहे हेच सांगताच येत नाही..

कारण..
तो विसरलेला असतो त्याचं 'मी' पण...
मग मागे उरतो कोण...?

एक शून्य... एकटाच..

Friday, September 07, 2007

काल रात्री...

काल रात्री,
तो भिकारी चंद्र
आला होता माझ्या अंगणात...
मळक्या चेह-याचा,
नि फाटक्या ढगांची लक्तरं पांघरलेला...

सुर्याला म्हणावं,
सकाळी अंगण नीट झाडून घे...
तारकांचा कचरा फार झालाय अंगणात...

मी...अनंत...

ब-याचदा मी लहान मूल होतो..
आणि अवखळ रूईच्या म्हातारी मागं धावत विसरून जावं घरदार…
तसं स्वत:ला विसरून या स्वरांमागे धावत जातो…
या देहाचे उंबरे लंघून … शब्दांची कुंपणं तोडून..
भावभावनांची वेस ओलांडून…मी स्वरांसोबत चालू लागतो..

काही वेळानं ते माझा हात हातात घेतात..
चालता चालता अलगद उचलून कडेवर घेतात..
अन एक अनोखा प्रवास सुरु होतो..

आम्ही अवकाशाचा कप्पा कप्पा व्यापत जातो..
सारे आभास कापत जातो..
सा-या दिशा व्यापून आम्ही दिगंत होतो..

या स्वरांसोबत चालता चालता मी ही अनंत होतो..

Friday, July 06, 2007

पाऊस-३

मनाच्या शिवारी गर्द दाटलेले घन...
आज भरले गगन... आठवांनी ।

कोंदलेली मनातून अनामिक हुरहुर..
एक अस्वस्थ काहूर... या दिशांनी ।

याच पावसाने केले असे जीवघेणे घात..
तुझी सजली वरात... या फुलांनी ।

सनईने गायला ग असा निखा-यांचा राग...
लागे सपनांना आग... त्या स्वरांनी ।

आत सलणारा जरी घाव होता खोल खोल...
दिला निरोप अबोल... नयनांनी ।

तुझ्या अंगणात सुख मेघांपरि बरसावे
असे तुझे घर व्हावे... आबादानी ।

आता एकला पाऊस आता एकले भिजणे..
आणि एकले थिजणे...आठवांनी ।

रानभर वेचतो मी आता तुझ्या खुणा ।
आता येणे नाही पुन्हा... या ठिकाणी ।

Thursday, July 05, 2007

पाऊस-२

मेघमल्हाराची धून गाती दाटलेले घन..
चिंब भिजले गगन ... त्या सुरांनी ।

मनाचे उधाण भिडे आभाळाला थेट..
झाली तिची माझी भेट... आडरानी ।

ओल्या मिठीत मिटली तिने पापण्यांची फुले..
अन ओठांनी टिपले... थेंब पाणी ।

सोनपिवळ्या उन्हाने तिचे माखलेले अंग..
उमटले सप्तरंग ... आसमानी ।

काळ्या भुईने चोरला तिच्या केसांचा सुवास...
थेंब मोतियांची रास... पानोपानी ।

तिच्या पैजणांचे ताल धरू लागले मयुर...
झाले अधीर आतुर... गात गाणी ।

तिने मलाच पुसले वेड्या पावसाचे गूज...
केली जादुगरी आज... सांग कोणी ।

तिला हळूच म्हणालो,'तुझ्या ओठांशी मल्हार...
अशी खुळी जादुगार... तूच राणी ।

Thursday, December 21, 2006

संदर्भ

पाहीले तुझ्या डोळ्यांत जेव्हा…
मी मला सापडाया लागलो ।
तू हासलीस मुग्ध पाहुनी अन …
मी मला आवडाया लागलो ।

मानले की वेदनांना अंत नाही…
तरी त्यांची आता जराही खंत नाही…
स्पर्शता तू घाव ही गंधाळती…
सुगंधात मी बुडाया लागलो ।

एकांती उमलतील संदर्भ माझे..
ओठी तुझ्या हसतील शब्द माझे,
फुलतील देही श्वास माझे तुझ्या ..
हृदयी मी धडधडाया लागलो ।

Wednesday, June 07, 2006

अधांतर..

दिलेस का तू मलाच अंतर, मला कळेना..
जगू कसा तू गेल्यानंतर, मला कळेना..

आधाराला ना धरणी ना नभ आता हे,
साहू कसा मी हे अधांतर, मला कळेना..

हिरावले का सर्व पुन्हा मग तिने देऊनी?
नियतीचे हे काळे तंतर मला कळेना..

विचारता मी काय गुन्हा तो माझा जेव्हा,
का केले मग तू विषयांतर मला कळेना..

हाच अंत का तुझ्या नि माझ्या गोष्टीचा या,
की जीवघेणे हे मध्यंतर, मला कळेना..

कधी सखी, कधी सजणी, कधी वैरीण माझी,
तुझे असे हे वेषांतर , मला कळेना..

Tuesday, May 30, 2006

माझा एकांत आणि मी…

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..

पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो..

खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…
तेव्हा त्याला मी हळूच सांगतो
की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.
तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो..

अगदी सवयीनं
मी अंथरुणातून उठून बाजूला येतो.
तो माझा हात ओढतो
नि मला दमात घेतो,
‘ पांघरूणाची घडी कोण घालील?’
किंचित हसून मी घडी घालू लागतो.
पण मन बघ ना कसं वेड्यासारखं वागतं,
हसता हसता पापण्यांशी दव जमू लागतं.

तो विचारतो तेव्हा
पांघरूण कुरवाळून त्याला सांगतो,
की ‘ती’ ही अशीच भांडायची,
माझ्यावरचं प्रेम
किती सोप्या भाषेत मांडायची.

बाहेर पडताना
आरशाला मी डोळ्यांनीच विचारतो.
तो कुरकुरत असतानाच
माझं घराबाहेर पाऊल पडतं.
नव्या दिवसाशी नव्यानं नातं जडतं.

वाटेत मी कोणाशीच बोलत नसतो.
एकांत मला गप्प पाहून खिन्नपणे हसतो.
तोही माझ्यासोबत चालू लागतो..
बिचारा.. किती शहाण्यासारखा वागतो..
मग दोघंही बोलतो …खूप..
तुझ्याचविषयी..
तेव्हा वाट सरते… नकळत..
तुझ्या स्वप्नांत नकळत सरलेल्या
तोकड्या रात्रींसारखी…

दुपारी जेवताना रोज असंच घडतं.
हाताबरोबर मन अवघडतं.
पाण्यासोबतच डोळ्यांत
एक आठवण तरळते..
‘किती हट्टानं मला
तुझ्या डब्यातून भरवायचीस तू..
आणि शेवटला घास
खास स्वत:साठी उरवायचीस तू..’
मग मी निश्चल होतो,
एखाद्या चित्रासारखा..
तोच.. तोच तर मला घास भरवतो,
मग हळव्या मित्रासारखा.

घरट्यात परतल्या पाखरांसारख्या
आठवणी कलकलाट करतात संध्याकाळी..
सावल्यांसारख्या आठवणीही लांबलचक होतात.

रोज संध्याकाळी तुझी चाहूल येते,
मी दाराकडं धावतो..
निराश क्षणांशिवाय तिथं कुणीच नसतं.
मन वेडं आपलं.. स्वत:वरंच रूसतं..

झोपताना रोज
तुझी पत्रं मी त्याला दाखवतो.
तो म्हणतो, ‘ कितीदा वाचशील?
कितीदा मनाला रिझवून घेशील?
नि हसता हसता डोळे भिजवून घेशील?

मध्यरात्री पापण्या मिटल्यातरी
मी जागाच राहतो.
त्याला उठून गुपचूप
मला तुझ्या स्वप्नांचं पांघरूण घालताना
मी हळूच पाहतो..
तेव्हा उशाशी समाधानानं एकांत हसतो..

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी…

पाऊस

थेंबाथेंबानं फुलला ओला साजरा पाऊस,
तुझ्या लाजेत भिजला झाला लाजरा पाऊस.

जेव्हा केसांत माळले थेंब ओले गंधाळले,
गंध भुईस माखला रानमोगरा पाऊस.

ओल्या ओठांस टेकले ओठ ओले शहारले,
तुझ्या डोळ्यांत दिसला किती घाबरा पाऊस.

तुझ्या गाली ओघळले थेंब हसु चिंब ओले,
सा-या रानात हासला किती हासरा पाऊस..

Thursday, May 25, 2006

परी

अबोल ती , तिचे डोळे खूप बोलायचे..
मनातले गंधाळले गूज खोलायचे..

ओठी असे कुठलेसे जादूभरे गाणे ?
स्वरांसवे तिच्या सारे रान डोलायचे..

हसण्याची सर तिच्या भुरभुरताना,
हळूच एक पाखरु थेंब झेलायचे..

कोवळ्याशा पंखांची कोवळीशी परी ती,
पंख तिचे आभाळाचे स्वप्न पेलायचे..

Wednesday, May 24, 2006

भावनांच्या दूर गावी...

भावनांच्या दूर गावी एक वेडा राहतो,
क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..

पहाटेचा मंद वारा तुझा स्पर्श भासतो,
शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो,
अवखळ झ-यागत नादातच वाहतो,
क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..

कुणालाही उमजेना तो असा का वागतो,
चांदण्यांशी बोलताना रात सारी जागतो,
तुझे हसू झरताना चिंब चिंब नाहतो,
क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..

Monday, May 22, 2006

धुके..

रानभर आभासांचे धुके दाटले,
पापण्यांशी आठवांचे दव साठले..

अवचित पाय-यांशी हसली चाहूल,
क्षणभर..आलीस तू उगा वाटले..

मनातून बेभानशी घुमे धून वेडी,
सुरांसवे भांडताना शब्द फाटले..

तुला भरारण्या आता कशी साद घालू ?
नभ दावूनी तू माझे पंख छाटले..

Thursday, May 18, 2006

तू

तू पहाटस्वप्नांत स्फुरलेली स्वप्नधून,
तू निरभ्र नभात हसलेली चंद्रखूण,
तू हिरवळ ओली, तू चातक बोली,
तू गीत अरुवार कोकिळ कंठातून..

तू सोनेरी उन्हात झरलेली सर वेडी,
तू बासुरी मधल्या हळव्या स्वरांची गोडी,
तू सुरेल राग, तू स्वप्निल जाग,
तू श्वासांमधली अस्वस्थता थोडी थोडी..

तू स्वच्छंद बेबंद उसळती मुग्ध लाट,
तू प्राजक्तफुलांच्या सड्यात भिजली वाट,
तू रेशीम अंग, तू प्रीतीचा रंग,
तू गच्च धुक्याच्या मिठीतला नदीकाठ..

तू लाजून मिटली अल्लडशी चाफेकळी,
तू हस-या तान्हुल्याच्या गालावरली खळी,
तू चांदणनक्षी, तू वेल्हाळपक्षी,
तू हुरहुर अनामिक जागे जी सांजवेळी….

Wednesday, May 17, 2006

कोहिनूर..

जणु चांदव्यानं दिलं तुला रूपाचं आंदण,
त्याच चांदव्याचं सखे तुझ्या कपाळी गोंदण.

जिणं चढणीचा घाट माझी निखा-याची वाट,
माझ्या भाजल्या पाऊला तुझ्या प्रीतीच चंदन.

आता तुझीच ग आस सखे झाली माझे श्वास,
आणि तुझी खुळी प्रीत माझ्या हृदयी स्पंदन.

तुझी सपनेच सारी नाही पापण्यांत नीज,
माझ्यासवे रातभर काल जागलं चांदणं.

आता जगतात कोणी नाही माझ्यापरी धनी,
तुझी प्रीत कोहिनूर.. तिला मनाचे कोंदण…

Tuesday, May 16, 2006

परीकथा...

दोन वेडी पाखरं
रोज खिडकीत भेटायची..
चिमणी चिमणी प्रीत त्यांची
आभाळाला खेटायची..

चिमण्या चिमणीचे चिमणेसे रुसणे,
चिमुकली समजूत.. चिमणेसे हसणे..
चिमण्या प्रीतीची चिमणी कविता
खिडकीत माझ्या फुलायची…

चिमण्या प्रीतीचे रंग निराळे,
चिमण्या चोचींतले चिमुकले चाळे..
चिमण्या दोघांची चिमणी कहाणी,
जणू परीकथाच वाटायची..

दोन वेडी पाखरं
रोज खिडकीत भेटायची..
चिमणी चिमणी प्रीत त्यांची
आभाळाला खेटायची..

Monday, May 15, 2006

मीच...

मीच दाटेन डोळ्यांत मेघ काळासा होऊन,
मग आसवांचे पूर कसे थोपशील तू ?
मीच असेन नभात चंद्र बिलोर होऊन,
तेव्हा रातभर सखे कशी झोपशील तू ?

सूर माझेच गातील जेव्हा पाखरे रानात,
धून माझ्या बासरीची तुझ्या येईल कानात,
मग अनामिक ओढ जागू लागेल पायांत,
वेड्या पावलांना सखे कशी रोखशील तू ?

दूर जाशीलच किती सांग जाऊन जाऊन,
रोमारोमावर तुझ्या आता माझी स्पर्शखूण,
बघ मिटून पापण्या मीच तिथेही दिसेन,
आता तूच सांग सखे कुठे लपशील तू ?

Thursday, May 11, 2006

कुणीतरी …

चांदणं शिंपणारं कुणीतरी असावं.
श्वास पंपणारं कुणीतरी असावं.
निराशेच्या उन्हात भेगाळलेलं मन,
प्रेमानं लिंपणार कुणीतरी असावं.

मनाला भिडणारं कुणीतरी असावं.
हक्कानं चिडणारं कुणीतरी असावं.
माझ्यावर हसणारेच आहेत सारे,
माझ्यासाठी रडणारं कुणीतरी असावं.

स्वप्नांत दिसणारं कुणीतरी असावं.
हळवं रूसणारं कुणीतरी असावं.
संध्याकाळी आभासांचा गाव जागताना,
नसूनही असणारं कुणीतरी असावं.

Monday, March 27, 2006

सती..

त्यादिवशी दवाखान्याबाहेर बऱ्याच वर्षांनी ती भेटली.
राहती माणसं गेल्यावरती उजाड व्हावं घर तशी
सूनी भकास झालेली..
आणि भिंत भिंत कोसळ्ल्यावर फक्त उरावेत वासे
तशी केवळ सांगाडा राहिलेली.
मनात आलं हीच का ती वेडी पोर ?
नाकात वारं शिरल्या वासरागत सारं शिवार पालथं घालणारी,
कोकरांमागं धावणारी नि पाख्ररांसोबत बोलणारी ?

चेहऱ्यातच कुठेतरी खोल गेलेले तिचे डोळे..
हेच डोळे कधीतरी वर्गात चोरून बघायचे..
फुलपाखरांगत भिरभिरायचे,
कधी लटके रूसून बसायचे, खट्याळ खोड्या करायचे..
त्या डोळ्यांमध्ये आज कुठलीशी उदास धून होती..
अन खपली निघून गेल्यावरही वण तसाच राहावा,
तशी भाळी उरलेली पुसल्या कुंकवाची खूण होती..

चार गोष्टी बोलून झाल्यावर,
आठवणींची दार खोलून झाल्यावर,
म्हणाली,” तोलामोलाचा घरोबा अन भरलं घर पाहून दिलं.
मोठ्या हौसेनं थाटामाटात बापानं लगीन लावून दिलं..
मीही नवऱ्याला देव समजून ठेवला होता पायी जीव..
पापण्यांत हजार स्वप्नं घेऊन ओलांडली होती गावशीव..
पण त्याच देवानं पदरी असा निखाऱ्यांचा भोग दिला.
पहिलीवहिली भेट म्हणून हा विखारी रोग दिला..
पहाडासारखा नवरा माझा पोखरल्या झाडागत मोडून गेला..
या सरणाच्या वाटेवरती मला अशी सोडून गेला.

पहिलीवहिली पोर माझी, जणू अवखळ पाण्याची लाट..
रक्तातूनच घेऊन आली परतीची ती भयाण वाट..
हा रोग म्हणजे टोळधाड, टिकलं नाही एकही झाड.
मग माझी पोर तर इवलं फूल, कसा करील तिचे लाड ?
तरी आल्यासारखी वेडी चार दिवस राहून गेली,
माझ्या कुशीत शहाण्यासारखी चार दिवस पाहून गेली..

आता सासर नाही, माहेर नाही, आपलेपणाचा आहेर नाही.
बंद झालयं हरेक दार..तसे दिवसही राहिलेत चार..
या रांगेत आता औषधासाठी निमूट येऊन उभी राहते.
दिवस दिवस ढकलत राहते मरणाला असं पुढं पुढं..
जिवंतपणे वाहत जाते मीच जणू माझंच मढं..

कुणाला काही सांगताना आता काळीज फाटत नाही.
इतर रोग्यांइतकेच आता याही रांगेत असतात लोक,
म्हणून इथं उभं राहताना आजकाल काही वाटत नाही.
पण याच रांगेत कुल्टाही अन वेश्याही येत असतात पुन्हा पुन्हा..
कुणीतरी सांगेल का की पतिव्रतेचा काय गुन्हा ?
नीतीमत्ता सोडली ज्यानं त्याची ऐसी परिणती..
मग त्याच सरणामध्ये मीही का म्हणून जावं सती..?

-मुक्या