Tuesday, August 09, 2011

सौदामिनी…

सौदामिनी…
अगं… कुठल्याशा कभिन्न ढगामागुन
दावून जातेस तू,
प्रकाशानं ओथंबलेलं तुझं तेजाळ रुप…
आणि मी मात्र,
आपल्याच मुळांशी खिळलेला,
माझ्याच पारंब्यांच्या गुंत्यात
अडकून पडलेला…
बांधत बसतो अंदाज
येणा-या प्रत्येक ढगामागं
तुझ्या असण्या-नसण्याचे.
आणि क्षणैकच दिसलेल्या
तुझ्या त्या हसण्यातून ओघळलेल्या
प्रकाशधारांत न्हाऊन घेतो मी…

एक दिवस
अशाच एखाद्या कभिन्न ढगामागुन येशील,
आणि घेशील मला तुझ्या अग्निमिठीत…
तेव्हा कदाचित राखच उरेल माझी.
त्या निर्वाणक्षणापर्यंत एवढं पुरे…

Monday, August 08, 2011

नीना- १

नीना…
एखाद्या परीकथेतली जणू तू.
शुभ्र केसांची नि भुऱ्या डोळ्यांची...
बुढ्ढी के बालवाल्याकडच्या
मिठाईसारखेच तुझे ते केस
आणि तितकाच गोडवा तुझ्यातही.
एखाद्या परीच्या शुभ्र रेशमी चमचम झग्यासारखं
भरजरी नेसलेलं तुझं म्हातारपण.
तितकंच जादुई ते तुझं जगही…

काहीतरी जादू होती खरी तुझ्याकडं…
रात्री झोपताना तू सांगितलेल्या
त्या साऱ्या पऱ्यांच्या गोष्टींचं
स्वप्नांत रूपांतर करणं,
नीना कसं गं जमायचं तुला?
आणि सकाळी जागं करतानाचा
तुझा नितळ दैवी चेहरा बघून
दिवसभर असं वाटायचं
स्वप्न संपलंच नाहिये अजून…

जादू नक्कीच होती तुझ्याकडं…
तुझ्या हातात पडलेली प्रत्येक गोष्ट
जादूचीच जणू होई,
मग ती एखादी साधी पळी असो
वा अगदी बारीक छोटीशी सुई.
शिळ्यापाक्याचीही पक्वान्न करायचीस..
आणि जुन्या साड्यांचे झगे.
पडक्या परसाची करायचीस बाग
अन हरखून जायचे बघे.

पंख तर नक्कीच होते तुझ्याकडं,
कधी कुणाला दिसत नसतील तरी.
कारण पूर्ण दोन पिढ्यांचं अशक्य अंतर
काही क्षणांतच कापून,
अलगद उतरायचीस तू
आमच्या भातुकलीच्या घरात
अगदी आमच्याएवढीच होऊन.

काही अशक्य गोष्टीही जमायच्या तुला,
मी गुडघे फोडून घेतल्यावर
साध्या खोबऱ्याच्या तेलानंही
जखमा भरण्याची जादू होती तुझ्या बोटांत.
त्याच सुरकुतलेल्या बोटांनी पुसायचीस माझे डोळे
आणि साऱ्या अश्रूंचं हसू बनवून
ठेवायचीस नकळत माझ्या ओठांवर.
मग ठेवायचीस माझ्या तळहाती
जादूमंतर करून तुझा तो साखरदाण्यांचा खाऊ,
ज्याचा कधी न संपणारा तुझा डबा
तुझ्या ट्रंकेत अजुनही शोधतोच आहे मी.

तुझ्या गावी दु:खं दिसलीच नाही कधी.
तुला काही दु:खं अशी नव्हतीच का गं?
की ठेवून आली होतीस तीही,
दूर सातासमुद्रापलिकडल्या
अज्ञात बेटावरच्या उंच मनोऱ्यावर,
सात पेट्यांमधल्या बंद पेटीत.
तुझ्या त्या साखरदाण्यांच्या डब्यासारखंच कुठेतरी.

आणि रूपं बदलणंही जमतच होतं ना तुला?
ओव्याअभंगांपासून म्हणीउखाण्यापर्यंत
सारं तोंडपाठ असणारी बहिणाबाई,
गाथापुराणांपासून इतिहासाकथांपर्यंत
सारं सारं सांगणारी  जणू जिजाई,
आजारपणातली माझी सख्खी सोबतीण,
किंवा माझ्या अनेक खोड्यांची रहस्य
गुपचूप दडवून ठेवणारी माझी मैत्रीण...
काहीही अगदी सहजच होऊ शकायचीस तू.
मग त्या माझ्या मैत्रीणीचं रूप घेताघेताच
कधीतरी नानीची 'नीना'ही अशीच झाली असावीस तू.

~~~

नीना,
कधी कधी पावसातून घरी येताना अजूनही वाटतं,
की शुभ्र चमचम केसांच्या परीसारखी दार उघडशील …
भिजलेल्या मला टिपून घेशील
तुझ्या मऊ सुती पदरानं,
आणि ठेवशील माझ्या तळहाती
जादूमंतर करून तुझा तो साखरदाण्यांचा खाऊ.

एवढी एक जादू तुला जमायला हवी होती गं...

नीना- २

नीना,
तू अजूनही येतेस माझ्या स्वप्नांत.
घेतेस मला गुरफटून
तुझ्या मऊ सुती पदराच्या
गंधाळलेल्या उबेत.
केसांमधून जाणवतात
तुझी सुरकुतलेली जादुई बोटं.
आणि ऐकू येत मंदमंद
तुझ्या बिनदाताच्या मुखातून
मृदुमुलायम झालेल्या स्वरांचं एक गाणं.
पहाटे कुण्या पक्षाच्या आवाजात
जे विरून जातं कुठेतरी…

सकाळी जागा होतो तेव्हा
मी रात्रभर पांघरलेल्या
तुझ्या त्याच मऊ सुती लुगड्याच्या गोधडीतून
येत असतो तुझा चंदनी गंध.

नीना, त्या चंदनखोडासारखीच तू…
कधी संपलीस… मला कळलंच नाही.


Tuesday, October 09, 2007

स्वप्ने...

का तुला पाहताना उमलतात स्वप्ने काही..?
मृदुल हळवी तरी का सलतात स्वप्ने का ही..?

क्षणाक्षणाने छळते रात ही अशीच मजला...
अंधारगूज जेव्हा उकलतात स्वप्ने काही...

सुने भकास जरी हे आकाश माझ्या मनाचे,
अलवार चांदण्यांची फुलतात स्वप्ने काही...

ही जादू तुझ्या स्वरांची भारते रान सारे,
वाट माझ्या पावलांची बदलतात स्वप्ने काही...

Wednesday, September 19, 2007

मी स्वच्छंद भरारतो...

मी स्वच्छंद भरारतो,
मनानं...कधी देहानं...
कधी कंटाळून जगण्याला,
कधी जगण्याच्याच मोहानं..

कधी कुठे गवसतात
कलकल कविता झ-यांच्या...
हिरवळीत उमटलेल्या
पाऊलखुणा प-यांच्या..

कधी ओठांनी पिऊन घेतो
रंग अबोली फुलांचे..
अन डोळ्यांनी टिपून घेतो
हसू हसर्या मुलांचे...

पाऊलांच्या उर्मीनं...
कधी मृद्गंधाच्या स्नेहानं..
मी स्वच्छंद भरारतो,
मनानं...कधी देहानं...

Monday, September 17, 2007

एक शून्य...

खरंतर..
'मी'पण विसरुन प्रेम करण्यातच तो फसतो..
आणि असंच समजून बसतो, तिचंही तसंच असावं...

मग कधीतरी ती विचारते अचानक,
'तुझा काय संबंध..? तू आहेस कोण...?'
त्याला मग काही बोलताच येत नाही..
तो कोण आहे हेच सांगताच येत नाही..

कारण..
तो विसरलेला असतो त्याचं 'मी' पण...
मग मागे उरतो कोण...?

एक शून्य... एकटाच..

Friday, September 07, 2007

काल रात्री...

काल रात्री,
तो भिकारी चंद्र
आला होता माझ्या अंगणात...
मळक्या चेह-याचा,
नि फाटक्या ढगांची लक्तरं पांघरलेला...

सुर्याला म्हणावं,
सकाळी अंगण नीट झाडून घे...
तारकांचा कचरा फार झालाय अंगणात...

मी...अनंत...

ब-याचदा मी लहान मूल होतो..
आणि अवखळ रूईच्या म्हातारी मागं धावत विसरून जावं घरदार…
तसं स्वत:ला विसरून या स्वरांमागे धावत जातो…
या देहाचे उंबरे लंघून … शब्दांची कुंपणं तोडून..
भावभावनांची वेस ओलांडून…मी स्वरांसोबत चालू लागतो..

काही वेळानं ते माझा हात हातात घेतात..
चालता चालता अलगद उचलून कडेवर घेतात..
अन एक अनोखा प्रवास सुरु होतो..

आम्ही अवकाशाचा कप्पा कप्पा व्यापत जातो..
सारे आभास कापत जातो..
सा-या दिशा व्यापून आम्ही दिगंत होतो..

या स्वरांसोबत चालता चालता मी ही अनंत होतो..

Friday, July 06, 2007

पाऊस-३

मनाच्या शिवारी गर्द दाटलेले घन...
आज भरले गगन... आठवांनी ।

कोंदलेली मनातून अनामिक हुरहुर..
एक अस्वस्थ काहूर... या दिशांनी ।

याच पावसाने केले असे जीवघेणे घात..
तुझी सजली वरात... या फुलांनी ।

सनईने गायला ग असा निखा-यांचा राग...
लागे सपनांना आग... त्या स्वरांनी ।

आत सलणारा जरी घाव होता खोल खोल...
दिला निरोप अबोल... नयनांनी ।

तुझ्या अंगणात सुख मेघांपरि बरसावे
असे तुझे घर व्हावे... आबादानी ।

आता एकला पाऊस आता एकले भिजणे..
आणि एकले थिजणे...आठवांनी ।

रानभर वेचतो मी आता तुझ्या खुणा ।
आता येणे नाही पुन्हा... या ठिकाणी ।