Tuesday, May 30, 2006

माझा एकांत आणि मी…

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..

पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो..

खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…
तेव्हा त्याला मी हळूच सांगतो
की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.
तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो..

अगदी सवयीनं
मी अंथरुणातून उठून बाजूला येतो.
तो माझा हात ओढतो
नि मला दमात घेतो,
‘ पांघरूणाची घडी कोण घालील?’
किंचित हसून मी घडी घालू लागतो.
पण मन बघ ना कसं वेड्यासारखं वागतं,
हसता हसता पापण्यांशी दव जमू लागतं.

तो विचारतो तेव्हा
पांघरूण कुरवाळून त्याला सांगतो,
की ‘ती’ ही अशीच भांडायची,
माझ्यावरचं प्रेम
किती सोप्या भाषेत मांडायची.

बाहेर पडताना
आरशाला मी डोळ्यांनीच विचारतो.
तो कुरकुरत असतानाच
माझं घराबाहेर पाऊल पडतं.
नव्या दिवसाशी नव्यानं नातं जडतं.

वाटेत मी कोणाशीच बोलत नसतो.
एकांत मला गप्प पाहून खिन्नपणे हसतो.
तोही माझ्यासोबत चालू लागतो..
बिचारा.. किती शहाण्यासारखा वागतो..
मग दोघंही बोलतो …खूप..
तुझ्याचविषयी..
तेव्हा वाट सरते… नकळत..
तुझ्या स्वप्नांत नकळत सरलेल्या
तोकड्या रात्रींसारखी…

दुपारी जेवताना रोज असंच घडतं.
हाताबरोबर मन अवघडतं.
पाण्यासोबतच डोळ्यांत
एक आठवण तरळते..
‘किती हट्टानं मला
तुझ्या डब्यातून भरवायचीस तू..
आणि शेवटला घास
खास स्वत:साठी उरवायचीस तू..’
मग मी निश्चल होतो,
एखाद्या चित्रासारखा..
तोच.. तोच तर मला घास भरवतो,
मग हळव्या मित्रासारखा.

घरट्यात परतल्या पाखरांसारख्या
आठवणी कलकलाट करतात संध्याकाळी..
सावल्यांसारख्या आठवणीही लांबलचक होतात.

रोज संध्याकाळी तुझी चाहूल येते,
मी दाराकडं धावतो..
निराश क्षणांशिवाय तिथं कुणीच नसतं.
मन वेडं आपलं.. स्वत:वरंच रूसतं..

झोपताना रोज
तुझी पत्रं मी त्याला दाखवतो.
तो म्हणतो, ‘ कितीदा वाचशील?
कितीदा मनाला रिझवून घेशील?
नि हसता हसता डोळे भिजवून घेशील?

मध्यरात्री पापण्या मिटल्यातरी
मी जागाच राहतो.
त्याला उठून गुपचूप
मला तुझ्या स्वप्नांचं पांघरूण घालताना
मी हळूच पाहतो..
तेव्हा उशाशी समाधानानं एकांत हसतो..

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी…

पाऊस

थेंबाथेंबानं फुलला ओला साजरा पाऊस,
तुझ्या लाजेत भिजला झाला लाजरा पाऊस.

जेव्हा केसांत माळले थेंब ओले गंधाळले,
गंध भुईस माखला रानमोगरा पाऊस.

ओल्या ओठांस टेकले ओठ ओले शहारले,
तुझ्या डोळ्यांत दिसला किती घाबरा पाऊस.

तुझ्या गाली ओघळले थेंब हसु चिंब ओले,
सा-या रानात हासला किती हासरा पाऊस..

Thursday, May 25, 2006

परी

अबोल ती , तिचे डोळे खूप बोलायचे..
मनातले गंधाळले गूज खोलायचे..

ओठी असे कुठलेसे जादूभरे गाणे ?
स्वरांसवे तिच्या सारे रान डोलायचे..

हसण्याची सर तिच्या भुरभुरताना,
हळूच एक पाखरु थेंब झेलायचे..

कोवळ्याशा पंखांची कोवळीशी परी ती,
पंख तिचे आभाळाचे स्वप्न पेलायचे..

Wednesday, May 24, 2006

भावनांच्या दूर गावी...

भावनांच्या दूर गावी एक वेडा राहतो,
क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..

पहाटेचा मंद वारा तुझा स्पर्श भासतो,
शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो,
अवखळ झ-यागत नादातच वाहतो,
क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..

कुणालाही उमजेना तो असा का वागतो,
चांदण्यांशी बोलताना रात सारी जागतो,
तुझे हसू झरताना चिंब चिंब नाहतो,
क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..

Monday, May 22, 2006

धुके..

रानभर आभासांचे धुके दाटले,
पापण्यांशी आठवांचे दव साठले..

अवचित पाय-यांशी हसली चाहूल,
क्षणभर..आलीस तू उगा वाटले..

मनातून बेभानशी घुमे धून वेडी,
सुरांसवे भांडताना शब्द फाटले..

तुला भरारण्या आता कशी साद घालू ?
नभ दावूनी तू माझे पंख छाटले..

Thursday, May 18, 2006

तू

तू पहाटस्वप्नांत स्फुरलेली स्वप्नधून,
तू निरभ्र नभात हसलेली चंद्रखूण,
तू हिरवळ ओली, तू चातक बोली,
तू गीत अरुवार कोकिळ कंठातून..

तू सोनेरी उन्हात झरलेली सर वेडी,
तू बासुरी मधल्या हळव्या स्वरांची गोडी,
तू सुरेल राग, तू स्वप्निल जाग,
तू श्वासांमधली अस्वस्थता थोडी थोडी..

तू स्वच्छंद बेबंद उसळती मुग्ध लाट,
तू प्राजक्तफुलांच्या सड्यात भिजली वाट,
तू रेशीम अंग, तू प्रीतीचा रंग,
तू गच्च धुक्याच्या मिठीतला नदीकाठ..

तू लाजून मिटली अल्लडशी चाफेकळी,
तू हस-या तान्हुल्याच्या गालावरली खळी,
तू चांदणनक्षी, तू वेल्हाळपक्षी,
तू हुरहुर अनामिक जागे जी सांजवेळी….

Wednesday, May 17, 2006

कोहिनूर..

जणु चांदव्यानं दिलं तुला रूपाचं आंदण,
त्याच चांदव्याचं सखे तुझ्या कपाळी गोंदण.

जिणं चढणीचा घाट माझी निखा-याची वाट,
माझ्या भाजल्या पाऊला तुझ्या प्रीतीच चंदन.

आता तुझीच ग आस सखे झाली माझे श्वास,
आणि तुझी खुळी प्रीत माझ्या हृदयी स्पंदन.

तुझी सपनेच सारी नाही पापण्यांत नीज,
माझ्यासवे रातभर काल जागलं चांदणं.

आता जगतात कोणी नाही माझ्यापरी धनी,
तुझी प्रीत कोहिनूर.. तिला मनाचे कोंदण…

Tuesday, May 16, 2006

परीकथा...

दोन वेडी पाखरं
रोज खिडकीत भेटायची..
चिमणी चिमणी प्रीत त्यांची
आभाळाला खेटायची..

चिमण्या चिमणीचे चिमणेसे रुसणे,
चिमुकली समजूत.. चिमणेसे हसणे..
चिमण्या प्रीतीची चिमणी कविता
खिडकीत माझ्या फुलायची…

चिमण्या प्रीतीचे रंग निराळे,
चिमण्या चोचींतले चिमुकले चाळे..
चिमण्या दोघांची चिमणी कहाणी,
जणू परीकथाच वाटायची..

दोन वेडी पाखरं
रोज खिडकीत भेटायची..
चिमणी चिमणी प्रीत त्यांची
आभाळाला खेटायची..

Monday, May 15, 2006

मीच...

मीच दाटेन डोळ्यांत मेघ काळासा होऊन,
मग आसवांचे पूर कसे थोपशील तू ?
मीच असेन नभात चंद्र बिलोर होऊन,
तेव्हा रातभर सखे कशी झोपशील तू ?

सूर माझेच गातील जेव्हा पाखरे रानात,
धून माझ्या बासरीची तुझ्या येईल कानात,
मग अनामिक ओढ जागू लागेल पायांत,
वेड्या पावलांना सखे कशी रोखशील तू ?

दूर जाशीलच किती सांग जाऊन जाऊन,
रोमारोमावर तुझ्या आता माझी स्पर्शखूण,
बघ मिटून पापण्या मीच तिथेही दिसेन,
आता तूच सांग सखे कुठे लपशील तू ?

Thursday, May 11, 2006

कुणीतरी …

चांदणं शिंपणारं कुणीतरी असावं.
श्वास पंपणारं कुणीतरी असावं.
निराशेच्या उन्हात भेगाळलेलं मन,
प्रेमानं लिंपणार कुणीतरी असावं.

मनाला भिडणारं कुणीतरी असावं.
हक्कानं चिडणारं कुणीतरी असावं.
माझ्यावर हसणारेच आहेत सारे,
माझ्यासाठी रडणारं कुणीतरी असावं.

स्वप्नांत दिसणारं कुणीतरी असावं.
हळवं रूसणारं कुणीतरी असावं.
संध्याकाळी आभासांचा गाव जागताना,
नसूनही असणारं कुणीतरी असावं.