Tuesday, May 30, 2006

माझा एकांत आणि मी…

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..

पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो..

खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…
तेव्हा त्याला मी हळूच सांगतो
की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.
तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो..

अगदी सवयीनं
मी अंथरुणातून उठून बाजूला येतो.
तो माझा हात ओढतो
नि मला दमात घेतो,
‘ पांघरूणाची घडी कोण घालील?’
किंचित हसून मी घडी घालू लागतो.
पण मन बघ ना कसं वेड्यासारखं वागतं,
हसता हसता पापण्यांशी दव जमू लागतं.

तो विचारतो तेव्हा
पांघरूण कुरवाळून त्याला सांगतो,
की ‘ती’ ही अशीच भांडायची,
माझ्यावरचं प्रेम
किती सोप्या भाषेत मांडायची.

बाहेर पडताना
आरशाला मी डोळ्यांनीच विचारतो.
तो कुरकुरत असतानाच
माझं घराबाहेर पाऊल पडतं.
नव्या दिवसाशी नव्यानं नातं जडतं.

वाटेत मी कोणाशीच बोलत नसतो.
एकांत मला गप्प पाहून खिन्नपणे हसतो.
तोही माझ्यासोबत चालू लागतो..
बिचारा.. किती शहाण्यासारखा वागतो..
मग दोघंही बोलतो …खूप..
तुझ्याचविषयी..
तेव्हा वाट सरते… नकळत..
तुझ्या स्वप्नांत नकळत सरलेल्या
तोकड्या रात्रींसारखी…

दुपारी जेवताना रोज असंच घडतं.
हाताबरोबर मन अवघडतं.
पाण्यासोबतच डोळ्यांत
एक आठवण तरळते..
‘किती हट्टानं मला
तुझ्या डब्यातून भरवायचीस तू..
आणि शेवटला घास
खास स्वत:साठी उरवायचीस तू..’
मग मी निश्चल होतो,
एखाद्या चित्रासारखा..
तोच.. तोच तर मला घास भरवतो,
मग हळव्या मित्रासारखा.

घरट्यात परतल्या पाखरांसारख्या
आठवणी कलकलाट करतात संध्याकाळी..
सावल्यांसारख्या आठवणीही लांबलचक होतात.

रोज संध्याकाळी तुझी चाहूल येते,
मी दाराकडं धावतो..
निराश क्षणांशिवाय तिथं कुणीच नसतं.
मन वेडं आपलं.. स्वत:वरंच रूसतं..

झोपताना रोज
तुझी पत्रं मी त्याला दाखवतो.
तो म्हणतो, ‘ कितीदा वाचशील?
कितीदा मनाला रिझवून घेशील?
नि हसता हसता डोळे भिजवून घेशील?

मध्यरात्री पापण्या मिटल्यातरी
मी जागाच राहतो.
त्याला उठून गुपचूप
मला तुझ्या स्वप्नांचं पांघरूण घालताना
मी हळूच पाहतो..
तेव्हा उशाशी समाधानानं एकांत हसतो..

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी…

No comments: